
सोलापूर ः ‘‘राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाने केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांची (Flagship Scheme) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिक गतीने काम करावे, तसेच किसान क्रेडिट कार्ड, (Kisan Credit Card) पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या कामाला प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Manukumar Shreevastav) यांनी केले.
मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांचा आढावा श्रीवास्तव यांनी घेतला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर उपस्थित होते.
श्रीवास्तव म्हणाले, ‘‘ पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ संबंधित पात्र शेतकरी लाभार्थ्यांना मिळण्यासाठी भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे डाटा अपलोड करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे. प्रलंबित प्रकरणाची तपासणी व्यवस्थित करून घ्यावी व संबंधित शेतकरी त्या गावात अथवा तालुक्यात मिळून येत नसेल,
तर त्यांची अत्यंत दक्षपणे चौकशी करूनच नावे वगळण्याची कार्यवाही करावी. एकही पात्र लाभार्थी डेटा अपलोड करण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. किसान क्रेडिट कार्डचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, जिल्हा अग्रणी बँकेद्वारे सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून क्रेडिट कार्ड वितरित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी.’’
आधारशी ई-केवायसी करण्याची आज शेवट मुदत
सोलापूर : ‘‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत आधारशी ई केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या.
परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ दिली होती. ही मुदत आज (ता. ३०) संपत आहे. शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया आज पूर्ण करावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत,’’ असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात अजूनही १ लाख ५७ हजार लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. कृषी विभाग, सर्व तहसीलदार, तलाठी, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांची बँक खाते पडताळणी केलेल्या आधार क्रमांकाशी जोडून घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
सप्टेंबर २०२२ पासून वितरित केले जाणारे हप्ते आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या बँक खात्यावरच जमा होतील. त्यामुळे आज ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.