
लखमापूर, जि. नाशिक : कांदा हे नगदी मात्र दराबाबत (Onion Rate) बेभरवशाचे पीक अशी याची ओळख आहे. असे असतानाही कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड (Onion Cultivation) जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सरू केली आहे. मात्र दिवसागणिक मजुरांची टंचाई व मजुरी (Wage) मोठी डोकेदुखी ठरत असतानाच यांत्रिक पद्धतीने बी-पेरणी (Sowing) चांगला पर्याय समोर येऊ पाहत आहे.
सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. यापूर्वी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. पण आता बदलत्या काळात काही शेतकऱ्यांचा थेट कांदा पेरणीकडे कल दिसून येत आहे.
कांदा लागवडी मजुरांकडून करण्यासाठी एकरी किमान अकरा ते बारा हजारांच्या आसपास लागवड खर्च येतो. मजुरांची ने-आण व त्यांच्या पाहुणचारासाठी येणारा खर्च तसेच, रोपनिर्मिती जास्तीचे बियाणे, रोग व कीडनियंत्रण, शेतबांधणी आदींचा समावेश यात आहे.
मजुरांकडून लागवड करावयाची झाल्यास एकरी किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. अर्थात, मजूर कमी जास्त झाली तर यात बदल होत असला, तरी यंत्राच्या साह्याने पेरणी केल्यास अवघ्या काही तासांच्या आत दोन किलो बियाण्यात एकरभर लागवड केली जाते. त्यामुळे अवघा तीन हजारांच्या घरात एकरी खर्च जातो.
तुलनेत होणारी बचत
यांत्रिक पद्धतीने पेरणी केलेल्या कांद्याचा खर्च बियाणे दोन किलो चार ते पाच हजार, पेरणीसाठी तीन हजार, रासायनिक खत (एक ते दीड गोणी) चोवीसशे ते पंचवीसशे असा एकूण दहा ते बारा हजारांच्या आसपास खर्च येतो. यामुळे दिवसागणिक आता यांत्रिक पद्धतीने लागवड केल्याने वाढत्या खर्चाबरोबरच वेळेचीही बचत होते. पारंपरिक लागवडीचा खर्च ३० हजार खर्च येतो.
मजुरांकरवी लागवडीसाठी येणारा खर्च, बियाणे साधारण चार ते पाच किलो, रोपाचे व्यवस्थापन किमान दोन हजार, रोप तयार करणे व वाहतूक दोन ते तीन हजार, शेत बांधणी दोन हजार, लागवड मजुरी आकार तेरा हजार, मजूर वाहतूक तीन ते चार हजार रासायनिक खत (किमान तीन गोणी) पाच हजार असा किमान तीस ते पस्तीस हजारांचा खर्च येतो.
गत वर्षीपेक्षा यंदा मशिनने लागवड करणाऱ्यांची संख्या अधिक असून भविष्यात यात अजून वाढ होईल.
- दीपक कुटे, सायखेडा.
मागील वर्षी यांत्रिक पद्धतीने कांदा लागवड केल्याने अवघ्या दहा ते बारा हजारांच्या आसपास खर्च आला, त्यात खर्चात मोठी बचत झाली. उत्पादन व गुणवत्ताही चांगली राहिल्याने या वर्षीही पुन्हा यांत्रिक लागवडच केली आहे.
-आनंदराव मोगल, कांदा उत्पादक शेतकरी
कांद्याचे रोप टाकून त्याची लागवड करेपर्यंत होणारा त्रास दिवसागणिक वाढत आहे, यामुळे पैसा व वेळेचा अपव्यय होतो. किमान तीस ते पस्तीस हजारांचा खर्च येतो. यात बदल करावा लागेल.
- अंकुश मोगल, कांदा उत्पादक शेतकरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.