Animal Care : गुणवत्तापूर्ण रेतमात्रांचा वापर ठरतोय फायद्याचा...

आजऱ्यापासून तेरा किलोमीटरवर असणाऱ्या हालेवाडी (ता.आजरा,जि.कोल्हापूर) येथील चंद्रकांत वसंत पाटील यांनी दूध संस्थेच्या माध्यमातून जातिवंत दुधाळ म्हशी तयार होण्यासाठी गुणवत्तापूर्ण लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा पुरवठा सुरू केला.
Animal Care
Animal CareAgrowon

Animal Care : हालेवाडी (ता.आजरा,जि.कोल्हापूर) गावशिवारातील चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब वसंत पाटील यांची चार एकर शेती असून त्यामध्ये ऊस (Sugarcane) ,भात (Rice), भुईमूग लागवड असते.

शेतीबरोबरीने त्यांनी गावामध्ये पशूपालनाला (animal husbandry) चालना देण्यासाठी २०१६ मध्ये दुर्गामाता दूध संस्थेची स्थापना केली.

स्थापना केल्यानंतर बहुतांशी दूध संस्था केवळ पशुखाद्य (Animal Feed), अन्य वैद्यकीय उपचारासाठी औषधींचा पुरवठा दूध संघामार्फत करतात.

परंतु श्री.पाटील यांनी यावरच न थांबता संस्थेच्या सदस्यांच्या गोठ्यात जातिवंत दुधाळ म्हशी कशा वाढतील, त्या सुदृढ कशी राहतील याकडे लक्ष दिले.

यामुळे दुग्धोत्पादन वाढीस फायदा झाला. संस्थेचे ४० पशुपालक सभासद असून त्यांच्याकडे एकूण ५० म्हशी आणि पाच गाई आहेत. सध्या संस्थेमध्ये दररोज १२५ लिटर दुधाचे संकलन केले जाते. हे दूध गोकूळ डेअरीला जाते.

साधारणपणे २०१९ मध्ये एका मित्रामार्फत चंद्रकांत पाटील यांना भिलवडी येथील चितळे जीनस एबीएस इंडिया लि.च्या प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या लिंग वर्गीकृत रेतमात्रांची (सेक्स सॉर्टेड सिमेन) माहिती मिळाली.

गावातील प्रयोगशील पशुपालकांना सोबत घेऊन त्यांनी चितळे डेअरीचे संचालक विश्वास चितळे यांच्याशी चर्चा करून सुधारित रेतमात्रांची खरेदी करण्याची तयारी केली.

Animal Care
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्रा

परदेशातील मित्राची मदत ः

हालेवाडीतील पशुपालक जातिवंत पैदाशीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत हे लक्षात आल्यावर या गावातील नागरिक आणि सध्या ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेले अभियंता विकास खवरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला.

संस्थेसाठी त्यांनी दहा लिंग वर्गीकृत रेतमात्रा खरेदीचे पैसे पाठवून दिले. याचबरोबरीने दुर्गम भागातील पशुपालकांची अभ्यासू आणि प्रगतीकडे वाटचाल करण्याची वृत्ती लक्षात घेऊन विश्वास चितळे यांनी देखील या संस्थेला प्रायोगिक तत्त्वावर १० लिंग वर्गीकृत रेतमात्रा भेट दिल्या. संस्थेने देखील स्वतःच्या पैशातून दहा रेतमात्रांची खरेदी केली.

जातिवंत सहा रेड्यांचा जन्म ः

सुरुवातीला संस्थेच्या सदस्यांकडील १२ म्हशींमध्ये लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा वापर करण्यात आला. यापैकी सहा म्हशी गाभण राहिल्या. या सर्व म्हशींना सशक्त रेड्या जन्मल्या. उर्वरित सहा म्हशी अपुऱ्या माजामुळे गाभण राहिल्या नाहीत.

हे लक्षात घेऊन पशुपालकांना म्हैस व्यवस्थापनाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात म्हशींमध्ये लिंगवर्गीकृत रेतमात्रा वापरून जन्मलेल्या या पहिल्या सहा रेड्या आहेत.

आरोग्य आणि आहार व्यवस्थापनामुळे त्यांची वाढ देखील चांगली होत आहे. यामुळे नवीन तंत्रज्ञान वापराकडे पशुपालकांचा कल वाढला आहे.

दुधाळ म्हशींचे संगोपन ः

चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीन म्हशी आणि एक खिलार गाय आहे. २०१९ पर्यंत म्हशींमध्ये गर्भधारणेसाठी पाटील हे रेडा आणि कृत्रिम रेतनाचा वापर करत होते. परंतु यातून सशक्त दुधाळ पिढीची पैदास होतील याची खात्री होत नव्हती.

लिंग वर्गीकृत रेतमात्रेचा वापर सुरू केल्यानंतर मात्र त्यांना जातिवंत पैदाशीत फरक जाणून आला. म्हशींच्या आरोग्य आणि आहार व्यवस्थापनात चांगला बदल झाल्याने दूध उत्पादन वाढीस लागले.

पूर्वी त्यांच्याकडील म्हशी दिवसाला तीन लिटर दूध द्यायच्या,त्या आता पाच लिटर पर्यंत गेल्या आहेत. असाच फायदा संस्थेच्या सभासदांना होत आहे.

संस्थेतर्फे विविध उपक्रमांना चालना ः

दुर्गामाता दूध संस्थेमध्ये लिंग वर्गीकृत रेतमात्रा तसेच नोंदणीकृत वळुच्या रेतमात्रा उपलब्ध असतात. गावातील कृत्रिम रेतन सेवक विनायक पाटील यांच्याकडील कंटेनरमध्ये रेतमात्रांची योग्य प्रकारे साठवणूक केली जाते.

ज्या गाई,म्हशी लिंग वर्गीकृत रेतमात्रेच्या वापरासाठी योग्य आहेत त्यांचीच निवड केली जाते. संस्था रेतमात्रा विकत घेऊन सभासदांना मोफत उपलब्ध करून देते. दर्जेदार रेतमात्रेच्या वापरामुळे जातिवंत पैदास गोठ्यात वाढत आहे,तसेच

पुढील पिढीमध्ये दुग्धोत्पादनात देखील वाढ दिसून येत आहे. संस्थेतर्फे पशुपालकांना संकरित नेपिअर चारा ठोंब, मक्याचे बियाणे उपलब्ध करून दिले जाते. चारा लागवड, व्यवस्थापन, पशूखाद्य, खनिज मिश्रणांचा योग्य वापराबाबत सातत्याने पशुपालकांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ मिळत आहे.

पशुपालनातील अनुभवाबाबत श्री.पाटील म्हणाले की, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल हा जादा दूध उत्पादन देणाऱ्या म्हशी बाहेरील राज्यातून आणण्याकडे असतो.

बऱ्याचवेळा आपल्याकडील वातावरणात या गाई, म्हशी रूळल्या नाहीत तर त्यांच्या दूध उत्पादनावर परिणाम झालेला दिसतो.

हे लक्षात घेऊन जातिवंत दुधाळ पिढी आपल्या गोठ्यात तयार केली तर पुढील टप्यात आहे तेवढ्या जनावरांच्यामध्ये दूध उत्पादन वाढते.

गाई,म्हशींच्या आरोग्य आणि आहार व्यवस्थापनात योग्य बदल झाल्याने दुग्धोत्पादन वाढले आहे.

Animal Care
जातिवंत, दुधाळ गायींच्या पैदाशीसाठी परदेशी रेतमात्रा आणणार ः विनय कोरे 

कृत्रिम रेतन तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या बाबी ः

१) कृत्रिम रेतन करण्याअगोदर गाई, म्हशीने योग्य माज दाखवलेला असावा. कृत्रिम रेतन करण्यासाठी कालवडीचे वजन कमीत कमी २५० ते ३०० किलोपर्यंत असावे.

२) लिंग वर्गीकृत रेतमात्रा वापरण्यासाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वेतातील गाय, म्हशी सर्वात योग्य असतात. गायीची शारीरिक स्थिती व्यवस्थित असावी. ऋतुचक्र सुरू असावे. अवघड प्रसूती, गर्भाशय दोष असलेल्या गाई,म्हशींची निवड करू नये.

३) सकाळी लवकर किंवा सायंकाळी रेतन करावे. नेहमी उलटणाऱ्या गाई,म्हशींमध्ये लिंग वर्गीकृत रेतमात्रा वापरू नये. शक्यतो कमजोर, आजारी किंवा शारीरिक ऊर्जा कमी असलेल्या गाई,म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करू नये.

४) गाई,म्हशींना जंत निर्मूलन, लसीकरण आवश्यक. सकस चारा, दर्जेदार खनिजे आणि जीवनसत्त्वाचे मिश्रण खाद्यामध्ये आवश्यक. यामुळे आरोग्य चांगले राहून योग्य वेळी गाभण राहातात.

५) गर्भधारणेचे प्रमाण वाढवण्यासाठी गोठ्यातील पैदासक्षम गाई,म्हशींना एकाचवेळी माजावर आणणे फायद्याचे ठरते.

६) पशूतज्ज्ञांच्याकडूनच कृत्रिम रेतन करून घ्यावे. रेतमात्रांची साठवणूक शास्त्रीय पद्धतीने योग्य तापमानास नायट्रोजन टॅंकमध्ये करणे आवश्यक.

संपर्क ः चंद्रकांत पाटील, ९३५९९६१९४३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com