Red Pumpkin : लाल भोपळ्याच्या दर्जेदार उत्पादनात सातत्य

शहरी बाजारपेठ आणि किफायतशीर दर लक्षात घेऊन गेल्या पंधरा वर्षांपासून जळोची (ता. बारामती, जि. पुणे) येथील जगन्नाथ आणि विष्णू हिंगणे लाल भोपळ्याची लागवड करत आहेत. दरवर्षी दोन एकरांमध्ये त्यांची लाल भोपळ्याची लागवड असते. योग्य पीक व्यवस्थापन, दर्जेदार उत्पादनावर भर दिल्याने लाल भोपळ्यातून अपेक्षित आर्थिक फायदा होतो. या पिकामध्ये हिंगणे बंधूंनी वेगळी ओळख तयार केली आहे.
Red Pumpkin : लाल भोपळ्याच्या दर्जेदार उत्पादनात सातत्य

जळोची (ता. बारामती, जि. पुणे) येथील जगन्नाथ आणि विष्णू हिंगणे यांची ४० एकर शेती आहे. या शेतीमध्ये ऊस, पेरू, केसर आंबा (Kesar Mango), शेवगा, विविध फुलपिकांची लागवड (Flower Farming) असते. याचबरोबरीने गेल्या पंधरा वर्षांपासून लाल भोपळ्याचे (Red Pumpkin) (डांगर) दोन एकर क्षेत्रावर नियमित उत्पादन घेत आहेत. या पिकाच्या उत्पन्नातून इतर पिकांचा व्यवस्थापन खर्च भागविण्यावर त्यांचा भर आहे. लाल भोपळ्याच्या लागवडीबाबत (Red Pumpkin Cultivation) जगन्नाथ हिंगणे म्हणाले, की बाजारपेठेचा अभ्यास करून मी गेल्या पंधरा वर्षांपासून खरीप हंगामात लाल भोपळ्याची लागवड करत आहे.

Red Pumpkin : लाल भोपळ्याच्या दर्जेदार उत्पादनात सातत्य
शेतीच्या हाती यंदा भोपळा?

पहिल्यांदा काही क्षेत्रावर मर्यादित लागवड असायची. परंतु बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मी दरवर्षी दोन एकरांवर लाल भोपळ्याची लागवड करत आहे. शहरी बाजारपेठेत लाल भोपळ्याला चांगली मागणी टिकून असल्याने मी जून आणि सप्टेंबर महिन्यांत याची लागवड करतो. शक्यतो पितृपंधरवडा, नवरात्र या काळात लाल भोपळ्यास चांगला दर मिळतो. त्यामुळे जून महिन्यातील लागवडीवर माझा भर आहे. विविध पिकांची लागवड आणि व्यवस्थापनासाठी मला बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत असते.

लाल भोपळा लागवडीपूर्वी मे महिन्यात जमिनीची चांगली मशागत करून घेतो. त्यानंतर दोन ओळींमध्ये सहा फूट अंतरावर दंड पाडतो. त्यावर दीड फूट अंतराने छोटे खड्डे पाडून त्यामध्ये शेणखत, १०ः२६ः२६ आणि युरियाची योग्य मात्रा देऊन लाल भोपळ्याच्या दोन बियांची टोकण करतो. लागवडीनंतर पाटपाण्याने पाणी देऊन रान भिजवले जाते. प्रत्येक ६ ते ७ दिवसांनी पाटपाण्याने पाणी दिले जाते. यानंतर खुरपणी करून रासायनिक खताची मात्रा दिली जाते. याच दरम्यान प्रत्येक रोपाला मजबुती मिळावी तसेच वाढ चांगली होण्यासाठी १०० ग्रॅम कंपोस्ट खताची मात्रा दिली जाते.

Red Pumpkin : लाल भोपळ्याच्या दर्जेदार उत्पादनात सातत्य
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून उद्योजकतेकडे

साधारणपणे वाढीच्या टप्यात कीड, रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दोन ते तीन वेळा शिफारशीत कीडनाशकांची फवारणी केली जाते. कीड नियंत्रणासाठी चिकट सापळेदेखील लावले जातात. पीकवाढीच्या टप्प्यानुसार पाणी आणि खतांची मात्रा प्रत्येक आठवड्याला दिली जाते. फळधारणेच्या टप्प्यात एकरी ५० किलो १०ः२६ः२६ आणि २५ किलो युरिया खताची मात्रा दिली जाते. याचा फळांच्या वाढीसाठी फायदा होतो. योग्य आकार आणि गुणवत्तेची फळे मिळण्यासाठी वेलीवरील फळांची विरळणी केली जाते.

कमी जागेत जास्त फळे होऊन त्यांची वाढ खुंटू नये यासाठी लहान आकार असलेली, कीड-रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या लहान फळांची काढणी केली जाते. एका वेलीवर ३ ते ४ जोमदार वाढणारी फळे ठेवली जातात. याच काळात कीड, रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाते. फळांची चांगली वाढ होईल यादृष्टीने पीक व्यवस्थापन ठेवले जाते. साधारणपणे साडेतीन महिन्यांनी फळांची काढणी होते. हा लाल भोपळा सावलीत किमान ८ ते १० दिवस ठेवता येतो. त्यामुळे नुकसान होत नाही.

लाल भोपळ्याची बाजारपेठ

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल भोपळ्याची आवक प्रामुख्याने म्हैसूर (कर्नाटक) बरोबरच बार्शी, टेंभुर्णी, करमाळा, अक्कलकोट, औरंगाबाद, बारामती, दौंड या भागांतून होत असते. लाल भोपळ्याचा हंगाम वर्षभर असला, तरी प्रामुख्याने गणपतीनंतर आवकेला प्रांरभ होतो. पावसाळा सोडला तर वर्षभर आवक सुरू असल्याचे लाल भोपळ्याचे प्रमुख अडतदार सचिन हराळे सांगतात.

हंगामामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी ७० ते १०० टन भोपळ्यांची आवक होते. सरासरी ८ ते १५ रुपये प्रति किलो आणि पितृपंधरवड्यामध्ये मागणी वाढल्याने १२ ते १८ रुपये प्रति किलो असा दर मिळतो. पूर्वी केवळ काही प्रमाणावर होणारे लाल भोपळ्याचे उत्पादन आता वाढले आहे. शहरी भागातील हॉटेल्स आणि खाणावळींमधून लाल भोपळ्याला वर्षभर मागणी असते. हॉटेल्समध्ये सांबरासाठी लाल भोपळ्यास मागणी टिकून आहे. दररोज एका हॉटेलमध्ये सरासरी दोन किलो भोपळ्याचा वापर होतो. यामुळे भोपळ्याची बाजारपेठ विस्तारत असल्याचे हराळे सांगतात.

पुणे बाजार समितीमध्ये लाल भोपळ्याची विक्री

लाल भोपळ्याची काढणी आणि विक्री नियोजनाबाबत हिंगणे म्हणाले, की फळाचे वजन साधारण ८ ते १० किलो एवढे झाल्यानंतर काढणी केली जाते. मला एकरी सरासरी १५ टन उत्पादन मिळते. गेल्या १५ वर्षांपासून पुणे बाजार समितीमध्ये मी लाल भोपळ्याची विक्री करत आहे. प्रति किलोस सरासरी ८ ते १२ रुपये दर मिळतो. पितृपंधरवड्यामध्ये नैवेद्यासाठी विविध भाज्यांबरोबरच लाल भोपळ्याची मागणी असल्याने प्रति किलोला १२ ते १५ रुपये दर मिळतो. पीक व्यवस्थापन खर्च वजा जाता एकरी सत्तर हजारांचे उत्पन्न मिळते.

पितृपंधरवडा, नवरात्र आणि दसऱ्याला लाल भोपळ्याला चांगली मागणी असते. यादरम्यान फळांचे उत्पादन येईल असे मी लागवडीचे नियोजन ठेवतो. इतर पिकांच्या तुलनेत लाल भोपळ्याचे पीक उत्पादनासाठी सोपे आहे. या पिकासाठी खतांचे योग्य व्यवस्थापन, कीड, रोगांचे वेळीच नियंत्रण करणे महत्त्वाचे असते. वेळेवर फळांची विरळणी, दर्जेदार फळांची फुगवण आणि वजन वाढल्यास चांगले दर मिळतात. या पिकातून इतर पिकांचा व्यवस्थापन खर्च निघत असल्याने हे पीक किफायतशीर ठरते.

जगन्नाथ हिंगणे ९८२२७५०००७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com