Mushroom Industry : गडचिरोलीच्या लतादेवी पेदापल्ली यांनी अळिंबी उद्योगात तयार केली ओळख

Success Story : दुर्गम भाग अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख. मात्र याच जिल्ह्यातील अनेकांनी प्रयोगशीलतेच्या बळावर व्यावसायिकतेतून ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
Mushroom Industry
Mushroom Industry Agrowon

Indian Agriculture : गडचिरोलीमधील लतादेवी पेदापल्ली यांचे वडील सेवानिवृत्त एकात्मिक बालविकास अधिकारी. लता यांच्यासह त्यांच्या कुटुंबात चौघेजण आहेत. त्यांची भावंडे देखील उच्चशिक्षित आणि शासकीय, खासगी नोकरीत आहेत. लता पेदापल्ली या कला शाखेतील पदवीधर.

मात्र शिक्षणानंतर नोकरी न करता बाजारपेठेचा अभ्यास करून २०१८ मध्ये अळिंबी उत्पादनाचा निर्णय त्यांनी घेतला. व्यवसायासाठी कर्ज न काढता घरातून उपलब्ध झालेल्या गुंतवणुकीवर त्यांनी भर दिला. गडचिरोलीतील एका व्यक्तीने अळंबी व्यवसाय सुरू केला होता.

परंतु त्याला नोकरी लागल्याने त्याने हा व्यवसाय थांबविला. त्यांच्याकडून त्यासोबतच ऑनलाइनदेखील या व्यवसायाची माहिती लता यांनी घेतली. तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथे एका खासगी संस्थेकडून अळिंबी उत्पादनाबाबत प्रशिक्षण घेतले.

अळिंबी उत्पादनास सुरुवात

सुरुवातीला घराच्या टेरेसवर लता यांनी छोटी खोली तयार करून प्रायोगिक तत्त्वावर ५० बेड लावून अळिंबी उत्पादनास सुरुवात केली. गडचिरोली भागात आदिवासी जंगलातून अळिंबी संकलित करून त्याची गाव तसेच शहरात विक्री करतात.

त्यामुळे ग्राहकांना अळिंबी म्हणजे काय आणि त्याचा आहारात कसा वापर करावा याविषयी जागृतीची अधिक गरज भासली नाही. आदिवासी जंगलातून नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होणारे जंगली अळिंबीची विक्री करतात, परंतु ही अळिंबी पावसाळ्यातील काही दिवसच उपलब्ध असते.

Mushroom Industry
मशरुम उद्योगाचे लाखोचे नुकसान 

त्यामुळे इतर महिन्यांत असलेली मागणी लक्षात घेऊन सुरुवातीला लता पेदापल्ली यांनी व्यावसायिक पद्धतीने उत्पादित अळंबीचा सॅम्पल स्वरूपात निःशुल्क पुरवठा केला गेला. त्याआधारे टप्प्याटप्प्याने ग्राहक आणि बाजारपेठ मिळविण्यात यशस्वी झाल्या. कोरोना काळात लोकांना पौष्टिक आहाराचे महत्त्व कळाले होते. त्यामुळे लता यांनी अळिंबी उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला.

उत्पादनाबाबत लतादेवी म्हणाल्या, की अळिंबीचे बियाणे पुण्यावरून मागविले जाते. वाहतूक खर्चासह १५० रुपये किलो असा खर्च होतो. गेल्या चार वर्षांत वाढती मागणी लक्षात घेऊन मी ५० बेडपासून एक हजार बेडपर्यंत उत्पादन क्षमता वाढविली आहे.

सध्या मला एक हजार बेडसाठी २२ ते २५ किलो बियाण्याची गरज असते. बियाणे वापर दरावर उत्पादनाचे गणित अवलंबून असते. साधारणपणे बेड भरल्यानंतर २० ते २१ दिवसांनी अळिंबी उत्पादन मिळते. त्यानंतर तीन-चार दिवसांनी पुन्हा उत्पादन मिळते, अशाप्रकारे एका बेडपासून तीन ते चार वेळा उत्पादन घेता येते.

वर्षभरात एक हजार बेडच्या चार बॅचेस होतात. व्यवस्थापनावर उत्पादकता अवलंबून राहते. अळिंबी उत्पादनात आद्रता महत्त्वाची असते. तसेच स्वच्छतेवर भर दिला जातो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते.

एका बॅचच्या माध्यमातून ८० ते १०० किलो उत्पादन मिळते. थेट ग्राहकांशी संवाद साधून अळिंबीची विक्री केली जाते. ताज्या अळिंबीची विक्री न झाल्यास वाळवत त्यापासून पावडर तयार केली जाते. ताजी अळिंबी ४०० रुपये किलो आणि १०० ग्रॅम पावडरची विक्री ३०० रुपये या दराने होते. पावडरीला पुणे, मुंबई येथे चांगली मागणी आहे. दोन ते अडीच महिन्यात एका बॅचच्या माध्यमातून खर्च वजा जाता वीस हजाराचे उत्पन्न मिळते.

Mushroom Industry
सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र 

अळिंबी उद्योगाचा विस्तार

सुरुवातीला लता पेदापल्ली यांनी घरुनच अळिंबी व्यवसायाची सुरवात केली. त्यानंतर गेल्या चार वर्षांत व्यवसायाचा विस्तार करावयाचा असल्याने त्यांनी गडचिरोली एमआयडीसीमध्ये प्रस्ताव दाखल केला.

दुर्गम भागातील महिला अळिंबी व्यवसायासाठी पुढाकार घेत असल्याचे पाहून प्रशासनाने त्यांना जागेची उपलब्धता करून दिली. ही जागा सहा हजार चौरस फूट असून, त्यावर दोन हजार चौरस फुटांवर शेडची उभारणी केली आहे. यासाठी चार लाख रुपयांचा खर्च झाला आहे

विद्यापीठातर्फे गौरव...

लता पेदापल्ली या दुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यातील अळिंबी व्यवसायातील पहिल्याच यशस्वी महिला व्यावसायिक ठरल्या आहेत. त्यांच्या व्यावसायिकतेचा फायदा या भागातील स्वयंसाह्यता समूह तसेच इतर क्षेत्रातील महिलांना व्हावा यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संदीप कऱ्हाळे, गृहविज्ञान शाखेच्या निलीमा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यासोबतच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आठव्या सेमिस्टरमध्ये कार्यानुभव अंतर्गत लता पेदापल्ली अळिंबी उत्पादनाबाबत प्रशिक्षण देतात.

या माध्यमातून विद्यार्थी आणि दुर्गम भागातील महिलांमध्ये व्यावसायिकतेचे बीज रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. लता पेदापल्ली यांच्या अळिंबी उद्योगाची दखल घेत यंदाच्या महिला दिनी त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संपर्क - लता पेदापल्ली, ९५६१८९५१२०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com