Dairy Production : परिश्रमातून विस्तारतोय ‘नर्मदाई’ ब्रॅण्ड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड (एकोड) येथील संतोष घोडके यांनी आसरामाता शेतकरी गटाच्या माध्यमातून दुधावर आधारित प्रक्रियायुक्त उत्पादनांचा ‘नर्मदाई’ ब्रॅण्ड तयार केला आहे.
Milk Processing
Milk ProcessingAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (जुने नाव औरंगाबाद) पाचोड (एकोड) येथील संतोष घोडके यांचे मोठे कुटुंब आहे. दोन भावांच्या त्यांच्या कुटुंबात पत्नी सौ. सिंधू यांच्यासह दोन मुले, आई मंडणबाई, वडील भागाजी, भाऊ, त्यांची पत्नी सौ. सुनंदा व त्यांची दोन मुले असे सदस्य आहेत.

कुटुंबाची आठ एकर शेतीत पूर्वी डाळिंब पिकायचे (Pomegranate). अलीकडे पाच एकर मोसंबी (Mosambi), चारा पिके व कपाशी (Cotton) असते. पूर्वी शेतीला जोड म्हणून थारपारकर जातीच्या सहा गाय (Tharparkar Cow) होत्या. गावातील डेअरीला (Dairy Production) दूध पुरवून उर्वरित दुधाचा घरी वापर व्हायचा.

व्यावसायिक दृष्टिकोन जपला

पूर्वीचा दुग्ध व्यवसाय (Dairy Business) फायदेशीर होत नसल्याने २०१८-१९ मध्ये आधीच्या गायी विकून एक म्हैस व दोन एचएफ संकरित गायी घेतल्या. तीन वर्षांत गायींची संख्या १६ वर नेली. सुमारे १०० ते ११० लिटर दूध डेअरीला जाऊ लागले.

परंतु गायींची संख्या, खर्च व मजूरबळ हा विचार करता गायींची संख्या घटवून आठवर आणली. त्यावेळी दुधाला लिटरला ३० ते ३२ रुपये दर मिळायचा. परंतु मूल्यवर्धन केल्याशिवाय अर्थकारण उंचावणार नाही हे संतोष यांनी जाणले.

त्यातून प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्मितीकडे वळायचे त्यांनी ठरवले. सन २०२० मध्ये त्यानुसार यंत्रसामग्री आणून तूप, पेढे, खवा, बासुंदी तयार करून आपल्या गावासह परिसरातील गावांमध्ये विक्री सुरू केली. सुरुवातीस ३० ते ४० लिटर दुधावर प्रक्रिया व्हायची.

Milk Processing
Animal Feed : पशुखाद्य दरवाढीमुळे दूध उत्पादक अडचणीत

व्यवसाय विस्ताराचे प्रयत्न

पाचोड, एकोडसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणारा सोलापूर-धुळे महामार्ग, पैठण तालुक्‍यातील चितेगाव, झाल्टा, भालगाव फाटा, अडूळ आदी गावशिवारातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये ग्राहक शोधले. पदार्थाचा दर्जा उत्तम राखून व मागणीनुसार तत्पर पुरवठा करून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्याशी ग्राहक म्हणून नाळ जोडली.

आपले पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याची बाब वाढलेल्या मागणीवरून संतोष यांच्या वर्षभरातच लक्षात आली. त्यामुळे उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे व तज्ज्ञांनी वेळोवेळी उद्योग विस्तार व तांत्रिक मार्गदर्शन केले. भांडवलाची अडचण लक्षात घेता संतोष यांनी आसरामाता शेतकरी गटाच्या माध्यमातून ते उभे केले.

शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी, अर्थात पोकरा प्रकल्पातून दूध प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसाह्यासाठी प्रस्ताव सादर केला. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आणि पोकराचे विशाल आगलावे यांचे सहकार्य मिळाले.

उद्योगाचे पुढचे पाऊल

पोकराच्या माध्यमातून विस्तारलेला संतोष यांचा राज्यातील पहिलाच प्रकल्प असावा. पहिल्या टप्प्यात योजनेतून मिळालेल्या अर्थसहाय्यातून होमोनायझर, पाश्‍चरायझर, स्टोअरेज टॅंक, दूध चार अंश सेल्यिसला थंड करणारी यंत्रणा, बॉयलर, पॅकिंग आदी यंत्रसामग्री घेतली. सुरुवातीला

पेढे, खवा निर्मितीवर अधिक भर होता. नंतरच्या टप्प्यात म्हणजे फेब्रुवारी २०२२ नंतर शाही लस्सी, श्रीखंड, बासुंदी आदींच्या निर्मितीवर भर दिला.

आजी नर्मदाबाई यांच्या नावाने ‘नर्मदाई’ ब्रॅण्ड तयार करून आकर्षक पॅकिंगमध्ये विक्री सुरू केली. चव आणि दर्जामुळे ग्राहकांकडून पसंती मिळत राहिली.

उद्योगाची क्षमता वाढली

गेल्या वर्षी १०० लिटर दुधावर सुरू असलेली प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात मागणी वाढल्याने साडेचारशे ते पाचशे लिटरवर न्यावी लागली होती. यंदा ग्राहकांची मागणी लक्षात घेता किमान एक ते दीड हजार लिटरवर प्रक्रिया करून पदार्थ तयार करावी लागण्याची शक्‍यता संतोष यांनी व्यक्‍त केली आहे.

घरच्या गायींपासून मिळणारे दूध अपुरे पडते. त्यामुळे गावातील गोपालकृष्ण संस्थेकडून आवश्‍यक दुधाची खरेदी करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. शिवाय गटातील सुमारे १५ दुग्धोत्पादकही दुधाचा पुरवठा करतात.

आताच्या घडीला ४०० ते ४५० लिटर दुधावर प्रक्रिया होते. सध्या प्रति दिन दोन हजार कप लस्सी, ५०० ते ६०० कप दही व श्रीखंड, २० ते ३० लिटर ताक, ७ ते ८ किलो तूप अशी एकूण काही हजारांची विक्री सुरू असते.

Milk Processing
Milk Rate : नागरिकांच्या खिशाला कात्री, दूधाच्या दरात मोठी वाढ

संतोष यांच्या उद्योगातील ठळक बाबी

-संतोष यांच्यासह घरातील सर्व सदस्य उत्पादनासह विक्रीची जबाबदारी सांभाळतात.

-वेलची. केशरयुक्त श्रीखंड, बासुंदी, दही यांचा स्वाद उत्तम, घट्टपणाही. व्हॅनिला फ्लेवरयुक्त लस्सी.

केशर, वेलची, चारोळी, बदाम, काजूयुक्त बासुंदी.

-स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य. येत्या काळात आइस्क्रीम प्लांट उभारण्याचा मानस.

पुन्हा विस्ताराचे प्रयत्न

तीन महिन्यांपूर्वी अजून अर्थसाह्यासाठी प्रस्ताव दिला आहे. वीजपुरवठ्यावर मात करण्यासाठी ६५ केव्ही क्षमतेचे जनरेटर, कप पॅकिंग, पूर्णतः स्वयंचलित पद्धतीचे यंत्र, इनक्युबेशन रूम, श्रीखंड ग्राइंडर आदींची खरेदी केली आहे. वातानुकूलित वाहन घेणे सध्या शक्य नाही.

त्यामुळे लगतच्या जालना व बीड जिल्ह्यातील मागणी पोहोचवू शकत नसल्याची खंत संतोष व्यक्‍त करतात. किमान दीड टन माल वाहतुकीच्या अशा वाहनाची त्यांना गरज आहे.

संतोष घोडके, ९५७९५५२५२९, ९४२३७४२९७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com