Banana Cultivation Management : केळी मृग बाग लागवडीचे नियोजन

Banana Update : मृग बाग लागवड मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात करावी. लागवड गादीवाफ्यावर करावी. लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत. लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे कंद प्रक्रिया करावी.
Banana Cultivation
Banana CultivationAgrowon

डॉ. चंद्रशेखर पुजारी, डॉ. गणेश देशमुख, प्रा. अंजली मेंढे

Banana Farming : राज्यातील महत्त्वाचे फळपीक म्हणून केळी पीक ओळखले जाते. मात्र मागील काही वर्षांत केळी बागेत विविध समस्यांचा दिसून येत आहेत. त्यात प्रामुख्याने करपा (सिगाटोका) या बुरशीजन्य आणि कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

याशिवाय, वादळी वाऱ्यांसह पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान होत आहे.

महाराष्ट्रात केळी लागवड मुख्यतः जून-जुलै महिन्यांत केली जाते. यास मृग बाग असे म्हणतात. मृग बाग लागवडीतील केळी घड उन्हाळी हंगामात काढणीस तयार होतात. मागील काही वर्षांतील मृग बागेची स्थिती पाहता, या लागवडीत विविध कारणांनी दिसून येणाऱ्या नुकसानीची तीव्रता ही अधिक जाणवते.

गेल्या २ वर्षांपासून राज्यात कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हा रोग लागवडीच्या सुरुवातीस येतो. नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने नियंत्रणासाठी रोप पूर्णतः उपटून नष्ट करावे लागते.

विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय नसले तरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामूहिकरीत्या शिफारशीप्रमाणे योग्य काळजी घेतल्यास रोगास रोखणे शक्य आहे.

Banana Cultivation
Banana Crop Guidance : तांदलवाडी येथे केळी पिकाबाबत मार्गदर्शन

लागवडीची वेळ

- मृग बाग लागवडीची वेळ काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. मृग बाग केळी लागवड ही मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात करावी. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात लागवड करणे टाळावे.

- मागील वर्षी जून महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांवर सीएमव्ही रोगाचे प्रमाण काही भागांत अगदी नगण्य होते. तर काही बागा पूर्णतः रोगमुक्त होत्या.

मात्र जुलै-ऑगस्ट महिन्यांत लागवड केलेल्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत होता. काही ठिकाणी बागेतील सर्व झाडे उपटून नष्ट करण्याशिवाय दुसरा उपाय नसल्याचे दिसून आले.

लागवड पद्धती, लागवड अंतर

- केळी पिकाची लागवड ही गादीवाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर लागवड केल्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे साहजिकच घडांची वाढ चांगली होऊन ते वजनाने देखील अधिक भरतात.

- वेळोवेळी बागेत हलकी टिचणी करून झाडांना भर देत राहावे. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण कमी होते.

- रोग व्यवस्थापनामध्ये लागवडीचे अंतर ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. केळी फळपिकात ‘श्रीमंती’ व ‘फुले प्राइड’ यांसारख्या बुटक्या वाणांची लागवड दीड बाय दीड मीटर (१.५ मीटर बाय १.५ मीटर) अंतरावर करावी. तर ‘ग्रॅडनैन’ या उंच वाढणाऱ्या वाणाची १.७५ मीटर बाय १.७५ मीटर अंतरावर लागवड करावी.

- योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे बागेत हवा खेळती राहून बाग निरोगी राहण्यास मदत होते. दाट लागवडीमुळे (शिफारशीपेक्षा कमी अंतरावर) सिगाटोका व सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण निर्मिती होते.

लागवड साहित्य

- केळी फळपिकात लागवडीत कंद किंवा उतिसंवर्धित रोपे हे मुख्य लागवड साहित्य असते. रोगांच्या प्राथमिक प्रसारास लागवड साहित्य मुख्यतः कारणीभूत ठरते.

- कंदापासून लागवड करताना कंद निरोगी बागेतून निवडावेत. लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे कंद प्रक्रिया करावी.

- शेतकऱ्यांचा कल हा ऊतीसंवर्धित रोपांकडे अधिक असतो. मुळातच उतिसंवर्धित रोपे नाजूक असल्याने ती रोगास सहज बळी पडतात. उतिसंवर्धित रोपांची लागवड करताना रोपे उत्तम दुय्यम कणखरता असलेली व ४ ते ५ पान असलेली निवडावीत. छोटी, कमी पाने असलेली पुरेशी कणखरता नसलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करू नये.

संजीव कुंपण

- केळी बागेभोवती अल्प खर्चात, परंतु ठरणारे कुंपण म्हणजे सजीव कुंपण होय. यासाठी विविध पिकांची निवड करता येते. मात्र बरेच शेतकरी केळी लागवडीवेळी सजीव कुंपण लागवडीकडे दुर्लक्ष करतात.

- केळी संशोधन केंद्राने बागेभोवती दुहेरी ओळीत शेवरी पिकाची सजीव कुंपण म्हणून लागवड करण्याची शिफारस केली आहे. शेवरीच्या सजीव कुंपणाचे केळी पिकाच्या वाढीवर किंवा उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. मात्र त्याचे अनेक फायदे आहे.

हिवाळ्यात थंड वाऱ्यांपासून तर उन्हाळ्यात उष्ण लहरींपासून बागेचे संरक्षण होते. बऱ्याचदा वादळी वाऱ्यांमुळे झाडे मोडून किंवा उन्मळून पडणे तसेच घड देखील पडतात. मात्र, सजीव कुंपणामुळे वारे अडविले जाऊन बागेचे संरक्षण होते.

- उन्हाळ्यात संजीव कुंपणामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. यासाठीच मृग बाग लागवडीवेळी शेवरी पिकाची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

अन्नद्रव्यांचा शिफारशीत वापर

अन्नद्रव्यांचा विषेशतः नत्राचा समंजस वापर हा देखील रोग व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भाग आहे. पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यानंतर काही काळ बागेत पाणी साचल्यास तसेच हिवाळ्यात १० अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी झाल्यास केळीची पाने पिवळी दिसू लागतात. ही नत्राच्या कमतरतेची लक्षणे नाहीत.

मात्र काही बागायतदार गैरसमजातून नत्राचा अतिरिक्त वापर करतात. त्यामुळे बागेचे नुकसान होते. बागेत मावा किडीचा प्रादुर्भाव वाढून सीएमव्ही सारख्या विषाणूजन्य रोगाचा धोका वाढतो. तसेच जमिनीचे आरोग्यही बिघडते. त्यामुळे रासायनिक खतांचा शिफारशीत मात्रेनुसार वेळापत्रकाप्रमाणे वापर करावा.

- पारंपरिक पद्धतीने जमिनीतून खते देताना, प्रति हजार झाडांना नत्र २०० किलो (४३५ किलो युरिया), स्फुरद ६० किलो (३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि पालाश २०० किलो (३३२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) याप्रमाणे द्यावे.

- ठिबक सिंचनाद्वारे खतमात्रा दिल्यामुळे वाढीच्या अवस्थेत झाडांना अन्नद्रव्ये विद्राव्य स्वरूपात उपलब्ध होतात. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन झाडे निरोगी राहतात. तसेच खतांच्या मात्रेत २५ टक्के बचत होते.

जमिनीतून रासायनिक खते देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति १००० झाडे)

खते देण्याची वेळ---खते (ग्रॅम प्रति झाड) ००---नत्र (युरिया)---स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट)----पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश)

१) लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत---३७.५(८२)---६० (३७५)---५०(८३)

२) लागवडीनंतर ७५ दिवसांनी---३७.५ (८२)---००---००

३) लागवडीनंतर १२० दिवसांनी---३७.५ (८२)---००---००

४) लागवडीनंतर १६५ दिवसांनी---३७.५ (८२)---००---५० (८३)

५) लागवडीनंतर २१० दिवसांनी---१६.७ (३६)---००---००

६) लागवडीनंतर २५५ दिवसांनी---१६.७ (३६)---००---५० (८३)

७) लागवडीनंतर ३०० दिवसांनी---१६.७ (३६)---००---५० (८३)

एकूण---२०० (४३५)---६० (३७५)---२०० (३३२)

(टीप : वरील खतमात्रेतमध्ये माती परीक्षण अहवालानुसार योग्य ते बदल करावेत.)

Banana Cultivation
Banana Orchard Management : शिरपूर तालुक्यातील पद्माकर पाटील यांनी केलंय केळी बागेचे योग्य नियोजन

ठिबक सिंचनातून खत देण्याचे वेळापत्रक (फर्टिगेशन)

खतमात्रा देण्याची वेळ---आठवडे---किलो (प्रति १ हजार झाडे प्रति आठवडा)

००---००---युरिया---मोनोअमोनियम फॉस्फेट---म्युरेट ऑफ पोटॅश

१) १ ते १६---१६---४.५---६.५---३

२) १७ ते २८---१२---१३.५---००---८.५

३) २९ ते ४०---१२---५.५---००---७

४) ४१ ते ४४---४---००---५

(यासोबतच केळी लागवडीच्या वेळी शेणखत १० किलो, अझोस्पिरिलम २५ ग्रॅम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे वापर करावा.)

लागवडीनंतर घ्यावयाची काळजी

- पावसाळ्यात बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा त्वरित निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

- संपूर्ण बाग व बागेचे बांध कायम तणमुक्त व स्वच्छ ठेवावेत.

आंतरपिकांची लागवड टाळावी

- कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचे साधारणपणे ९०० पेक्षा अधिक पर्यायी यजमान पिके आहेत. जसे उडीद, मूग, सोयाबीन, कलिंगड, खरबूज, काकडी, टोमॅटो, मिरची, वांगी, मका ही महत्त्वाची यजमान पिके आहेत.

ज्या भागांत रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे, तेथे केळी लागवडीत आंतरपीक घेणे टाळावे. तसेच केळी लागवड परिसरात वर नमूद केलेल्या यजमान पिकांची लागवड करणे टाळावे. यासाठी गावपातळीवर सामूहिकरीत्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

रासायनिक नियंत्रण - (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

१) मावा कीड नियंत्रण -

सीएमव्ही रोगाचा प्रसार हा मावा किडीमार्फत होत असल्याने किडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किडीच्या नियंत्रणासाठी, थायमिथॉक्झाम ०.२ ग्रॅम.

२) सिगाटोका - सिगाटोका रोगाची दृश्‍य लक्षणे ही हिवाळ्यात दिसत असली, तरी रोगाची लागण पावसाळ्यात होते. त्यासाठी डायथेन (एम ४५) ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ लिटर स्टिकरसह फवारणी करावी.

३) सीएमव्ही - रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर, मावा किडींच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रीड ०.५ मिलि (टीप - ॲग्रेस्को शिफारशी आहेत.)

पिकांची फेरपालट -

पिकांची फेरपालट न करता सतत केळी पीक घेण्यामुळे रोगकारक बुरशी आणि विषाणूंचे जीवनचक्र सतत चालू राहते. त्यामुळे उपाययोजना करूनही रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होत नाही. यासाठी केळी पिकानंतर केळी पीक घेणे टाळावे. पिकांची फेरपालट करावी.

संपर्क - डॉ. चंद्रशेखर पुजारी, ९४२०९४३१४६, ०२५७-२२५०९८६, (अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com