
Yavatmal APMC Update : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आटोपल्या आहेत. काही ठिकाणी एका पक्षाला, तर काही ठिकाणी दोन पक्षाच्या आघाडी, युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यानंतर आता सभापतिपदी आपली वर्णी लागावी, यासाठी नव्या संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
याच महिन्याच्या अखेरीस सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांनी नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील १५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भाजप अशा सर्वच पक्षांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे.
१५ बाजार समित्यांपैकी कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव या बाजार समितीत काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादी तर दारव्हा-नेर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे. दिग्रस, यवतमाळ, बोरी अरब, महागाव, वणी आदी बाजार समित्यांवर भाजप, महाविकास आघाडी तसेच इतर आघाड्यांची सत्ता आली आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष बाजारसमिती सभापती आणि उपसभापती पदाकडे लागले आहे. या आठवड्यात अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. अधिसूचना निघाल्यानंतर सभापती, उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे. यावेळी आपल्याला पद मिळावे, यासाठी संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
यंदा बाजार समिती निकालात काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांनी बाजी मारली तर काही ठिकाणी जुन्यांनी गढ कायम राखण्यात यश मिळविले आहे. आपल्या मर्जीतील सभापती, उपसभापती असावा यासाठी नेत्यांनी चाचपणी सुरु केली आहे.
या महिन्यात १८ ते २० तारखेच्या सुमारास बाजार समिती सभापतींची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सभापती पदासाठी काही ठिकाणी नावे पूर्वनियोजित आहे. असे असले तरी काही ठिकाणी सभापती पदावर वर्णी लागावी, यासाठी संचालकांमध्ये चुरस दिसत आहे.
संख्याबळ जुळविण्यासाठी बैठका
सभापती पदाची खुर्ची आपल्याला मिळावी यासाठी आता संचालकांकडून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. अनेक संचालकांनी अंदाज घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. बाजार समितीच्या मैदानात सभापती निवडीवरून तयारी सुरू झाली असून पदाधिकारी कामाला लागले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.