
पुणेः जगात सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) ब्राझील आघाडीवर आहे. मात्र मागील हंगामात ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन घटले होते.
त्यामुळे २०२२ मध्ये ब्राझीलची सोयाबीन निर्यात (Soybean Export) घटली. तर मका, गहू आणि सोयापेंड (Soyacake) निर्यात विक्रमी पातळीवर पोचली, असा अंदाज ब्राझीलच्या धान्य निर्यातदार असोसिएशनने व्यक्त केला.
ब्राझीलने सोयाबीन उत्पादनात अमेरिकेला मागे टाकत मागील काही वर्षांपासून अव्वल क्रमांकावर झेप घेतली.
त्यामुळे ब्राझीलमधून सोयाबीन निर्यातही जास्त होते. तसेच मका उत्पादनात अमेरिका आणि चीननंतर ब्राझील तिसऱ्या स्थानावर आहे. गहू उत्पादनातही ब्राझीलचा मोठा वाटा असतो.
ब्राझीलमधून शेतीमाल निर्यातीचा आकडा आता पुढे आला. ब्राझीलने २०२२ मध्ये ४३२ लाख टन मक्याची निर्यात केली.
२०२१ मधील ब्राझीलची मका निर्यात २०६ लाख टनांवर होती. म्हणजेच मागीलवर्षी मका निर्यात दुप्पटीपेक्षा अधिक झाली.
रशिया आणि युक्रेन युध्दामुळे या दोन्ही देशांमधून होणारी मका निर्यात घटली. त्यामुळे ब्राझीलला विक्रमी मका निर्यात करता आली.
यंदाही विक्रमी निर्यातीचे उद्दीष्ट
- ब्राझीलच्या मक्याचा मुख्य ग्राहक इराण होता
- इराणला १२ टक्के मका निर्यात केला
- २०२३ मध्ये चीनला जास्त निर्यातीचे उद्दीष्ट
- ब्राझील यंदाही मका निर्यातीची गती कायम ठेवणार
- जानेवारीत ४३ लाख टन मका निर्यातीचे उद्दीष्ट
- २०२२ च्या जानेवारीत २२ लाख टन निर्यात केली होती
सोयाबीन निर्यात १० टक्क्यांनी घटली
मागील हंगामात ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन घटले होते. तरीही ७७० लाख टन निर्यात झाली. डिसेंबर महिन्यात १७ लाख टन निर्यात केली.
२०२१ मध्ये याच महिन्यातील निर्यात २३ लाख टन होती. ब्राझीलच्या सोयाबीनचा चीन सर्वात मोठा ग्राहक होता.
तब्बल ७० टक्के निर्यात चीनला केली होती. जानेवारीत १३ लाख टन निर्यात होण्याची शक्यता असून मागीलवर्षी याच महिन्यात २३ लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती.
ब्राझीलमध्ये जानेवारीच्या शेवटी सोयाबीन काढणीला सुरुवात होईल आणि फेब्रुवारीपासून निर्यातीची गती वाढण्याचा अंदाज आहे.
सोयापेंड निर्यात विक्रमी पातळीवर
- ब्राझीलने २०४ लाख टन सोयापेंड निर्यात केली
- प्रतिस्पर्धी अमेरिका आणि अर्जेंटीनातील सोयाबीनची टंचाई आणि लाॅजिस्टीकच्या अडचणींचा ब्राझीलला फायदा
- ब्राझीलच्या सोयापेंडचा मुख्य ग्राहक इंडोनेशिया ठरला
- इंडोनेशियाला १५ टक्के निर्यात
- थायलॅंड १३ टक्के आणि हाॅलंडला ११ टक्के निर्यात
- जानेवारीत १३ लाख टन सोयापेंड निर्यातीचा अंदाज
- २०२२ च्या जानेवारीत १५ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.