Cotton Market : कापूस दर वाढणार; पण कशामुळं?

Cotton Rate : सध्या कापूस असलेले अनेक शेतकरी पुढील एक ते दीड महिन्यात कापूस विकतील. पण एकाच दरपातळीवर हा कापूस बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे.
Cotton production
Cotton productionagrowon

Cotton Rate Update : कापूस बाजारात सध्या शेतकऱ्यांकडे किती कापूस (Cotton) शिल्लक आहे, यावरून मतभेद दिसत आहेत. उद्योगांच्या मते शेतकऱ्यांकडे अजूनही जास्त कापूस आहे. त्यामुळं पुढील दीड महीना आवकेचा दबाव असेल.

पण देशातील कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज आणि बाजारात आलेला कापूस, यावरून उद्योगांना वाटतं त्याप्रमाणात कापूस शिल्लक नाही, हे स्पष्ट आहे. तसेच पुढील काळात कापूस दरात सुधारणा होईल, असा अंदाज आहे.

कापूस बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. मागील आठवड्यात कापूस दरात सुधारणा झाली. त्यानंतर दर काहीसे स्थिरावले. दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली. यामुळं कापूस विक्रीही वाढली.

दरवाढीची अपेक्षा असणारे, पण जास्त दिवस थांबू शकत नाहीत, असे शेतकरी कापूस विकत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये आणखी शेतकरी कापूस विकतील, असा अंदाज उद्योगांकडून व्यक्त केला जातोय.

Cotton production
Cotton Production : केंद्र देणार अतिलांब कापूस धागा उत्पादनाला प्रोत्साहन

मार्च महिन्यात कापसाचे भाव दबावात होते. कापूस विकल्याशिवाय पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कापूस विकला. म्हणजेच बाजारात कापसाची आवक दाटली. दुसरीकडं फेब्रुवारीपासूनच उद्योग फायद्यात काम करत होते.

पण शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाहीत, हे माहित असल्यानं दर कमीच ठेवले गेले. शेतकऱ्यांनीही दर वाढत नाहीत म्हटल्यावर विक्री वाढवली.

पण आता स्टाॅक असलेले शेतकरी दरवाढल्याशिवाय कापूस विकणार नाहीत, हे माहित असल्यानंच भाव वाढवले गेले, असे अभ्यासकांनी सांगितले.

त्यातच सध्या शेतकऱ्यांकडं किती कापूस शिल्लक आहे, यावरून चर्चा सुरु आहे. तसचं देशातील कापूस पुरवठा नेमका किती? यावरून मतभेद असल्याचं दिसतं. पण सध्या शेतकऱ्यांकडं कमी कापूस आहे, हे मात्र नक्की.

उद्योगांच्या मते मार्च महिन्यापर्यंत बाजारात १९८ ते २०० लाख गाठी कापूस आला. तर शेतकऱ्यांकडं केवळ २० ते २५ टक्केच कापूस शिल्लक आहे.

जास्तीत जास्त ८० ते ९० लाख गाठी कापूस शेतकऱ्यांकडे असू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. कारण बहुतांश शेतकऱ्यांनी मागील महिनाभरात कापूस विकला.

Cotton production
Kabuli Chana Market : जगात काबुली हरभऱ्याचा तुटवडा राहणार; भाव वाढण्याचा अंदाज

सध्या कापूस असलेले अनेक शेतकरी पुढील एक ते दीड महिन्यात कापूस विकतील. पण एकाच दरपातळीवर हा कापूस बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं कापूस दरातही टप्प्याटप्यानं वाढ केली जाईल, असा अंदाज आहे.

पुढील पंधरवड्यात उद्योगांना सध्याच्या भावपातळीवर आणखी कापूस मिळू शकतो. पण त्यानंतर शेतकरी दरात चांगली वाढ झाल्याशिवाय कापूस देणार नाहीत. त्यामुळं उद्योगांकडूनही दरात वाढ केली जाईल, असा अंदाज आहे.

सध्याची दरपातळी काय?

सध्या कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळतोय. बाजारातील सरासरी कापूस आवक आता काहीशी कमी झाली. पण एप्रिल महिन्यातील सरासरी आवकेच्या तुलनेत जास्तच आहे.

सध्या दैनंदीन आवक ८० हजार ते ९० हजार गाठींच्या दरम्यान आहे. ही आवक पुढील काळात आणखी कमी होईल. त्यावेळी दरात सुधारणा दिसू शकते.

दरवाढीला आधार

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंही कापूस बाजार सुधारतोय. पुढील काळात कापूस दराला बांगलादेशच्या खरेदीचाही आधार मिळेल. बांगलादेश भारताकडून कापूस खरेदी वाढवेल, असा अंदाज उद्योगातील काही जाणकारांनी व्यक्त केला.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये डाॅलरऐवजी रुपयातील व्यवहार वाढेल, असंही सांगितलं जातं. तसचं सुतगिरण्यांकडेही सध्या कापसाचा स्टाॅक काहीसा कमी आहे. या सर्व कारणांमुळं कापूस दरात सुधारणा होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com