
देशात सध्या गहू दरवाढीने ग्राहकांना चांगलेच जेरीस आणलं आहे. आता सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात आणल्याने दर ५ टक्क्यांपर्यंत कमी झालेत. मात्र दरातील तेजी कायम आहे. त्यामुळे बाजाराची भिस्त यंदाच्या हंगामावर आहे.
सरकराने यंदा १ हजार १२० लाख टन गहू उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं आहे. मागील हंगामात १ हजार ६८ क्विंटल उत्पादन झालं होतं. तर २०२०-२१ मधील हंगामातील उत्पादन १ हजार ९५ लाख टन झाले होतं.
यंदा सरकारने विक्रमी गहू उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं आहे. मात्र जानेवारी महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनितील ओलावा कमी होत आहे. त्याचा गहू पिकाला फटका बसू शकतो, असा स्कायमेटचा अंदाज आहे.
पण यंदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक ठिकाणी गव्हाची लवकर पेरणी झाली होती. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठीच शेतकऱ्यांनी यंदा लवकर लागवड केली होती. जेणेकरून पिकाची दाणे भरण्याच्या अवस्थेत उष्णतेचा फटका बसणार नाही.
हवामान अभ्यासकांच्या मते जोपर्यंत दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढत नाही आणि रात्रीचे तापमान १५ अंश सेल्शिअसच्या पातळीला राहतं तोपर्यंत गव्हाच्या पिकाला धोका नाही.
अनेक भागांमध्ये सध्या थंडी आहे. या स्थितीचा गहू पिकाला फायदाच होत असल्याचे प्रक्रिया उद्योगातील सूत्रांनीही सांगितले.
हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यात पूर्व, ईशान्य भारत, मध्य पूर्व भारत आणि देशाच्या आणखी काही भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा काहीसे अधिक राहील, असा अंदाज जाहीर केला. तर मार्च महिन्याचा हवामान खात्याचा अंदाज फेब्रुवारीच्या शेवटी येईल.
आगाप पेरणीच्या पिकावर परिणाम नाही
मार्च महिन्यात यंदा तापमान वाढले तरी सरसकट गहू पिकावर परिणाम होणार नाही. कारण देशातील अनेक भागांमध्ये गव्हाची पेरणी लवकर झाली आहे.
म्हणजेच हा गहू काढणीलाही लवकर येईल, असे काही भागातील व्यापारी सांगत आहेत. पण तापमानात जास्त वाढ झाल्यास गहू उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.