
Success Story : पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुका (Purandar Taluka) हा फळबाग पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील सोनोरी गाव देखील शंभर टक्के फळबागेचे म्हणून ओळखले जाते. मुख्यतः गावची ओळख काही वर्षांपासून अंजिरात (fig) झाली असली तरी पेरूसह अन्य फळबागाही वाढू लागल्या आहेत.
गावातील विलास तात्याबा काळे यांची वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. पूर्वी त्यांचीही अंजिराची साडेतीनशे झाडे होती.
आता पेरूचे क्षेत्र त्यांनी वाढवले असून त्याचे क्षेत्र सव्वा तीन एकरांपर्यंत नेले आहे. त्यात सुमारे पाचशेपर्यंत झाडे आहेत. अंजिराची सुमारे १५० झाडे सीताफळाचीही ५०० पर्यंत झाडे आहेत.
पेरूच्या शेतीवर भर
काळे कुटुंब अकरा वर्षापूर्वी पेरूशेतीकडे वळले. त्यांनी सुरवातीला रत्नदीप या बाहेरून सफेद व आतून लाल रंग असलेल्या पेरूची ६० झाडे लावली. बाजारपेठेतील मागणी व दर यांचा अंदाज घेत झाडांची संख्या १२५ पर्यंत नेली.
बाजारपेठेत लखनौ ४९ या बाहेरून व आतून सफेद असलेल्या वाणालाही चांगली मागणी आहे हे लक्षात आल्यानंतर त्याचीही लागवड केली. पूर्वी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य होते. त्यामुळे विलास विहिरीच्या कामाला जायचे.
त्यातून थोडाफार पैसा हाती आल्यानंतर पाण्याच्या सोयीसाठी एक बोअरवेल घेतले. आज सोबतीला विहीर व दोन शेततळीही घेतली आहेत. त्या आधारे उन्हाळ्यात तसेच दुष्काळी काळात फळबागा जगविणे शक्य होते. ठिबकद्वारे पाणी देण्यात येते.
व्यवस्थापनातील बाबी
पेरूची लागवड १५ बाय १५ फूट अंतरावर केली आहे. छाटणी मार्चच्या दरम्यान केली जाते. त्यानंतर साधारण पाच महिन्यांनी काढणी हंगाम सुरू होतो. वर्षभरात अशा प्रकारे दोन हंगाम घेण्याचे तसेच छाटणीनंतर झाडाला काही काळ विश्रांतीही देण्याचेही नियोजन असते.
फळ पक्व होताना फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवर्जून काळजी घेण्यात येते. पूर्वी फळांची तोडणी केल्यानंतर बाजारपेठेत ती जाईपर्यंत काही कालावधी जायचा. आता पुण्यातील व्यापारी ताजी, दर्जेदार फळे खरेदी करण्यासाठी थेट बागेत सकाळीच येतात.
साहजिकच त्याचवेळी तोडणीचे व्यवस्थापन होते. परिणामी ग्राहकांनाही ताजी फळे उपलब्ध होतात. सासवडची बाजारपेठही पाच किलोमीटर अंतरावर आहे. व्यापाऱ्यांना जागेवर माल दिल्यानंतर उर्वरित विक्री याच बाजारपेठेत केली जाते.
पेरूचे मार्केट
साधारण ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचा पेरू असतो. लहान, मोठे आणि मध्यम अशा आकारात ग्रेडिंग केले जाते. त्यानंतर २० ते २२ किलोच्या क्रेटमधून ते बाजारपेठेत पाठवले जातात. काळे यांच्या अनुभवानुसार आँगस्ट ते आक्टोबर कालावधीत पेरूला सर्वाधिक मागणी असते.
त्यामुळे या कालावधीत अधिक दर मिळण्यास मदत होते. रत्नदीप वाणाला किलोला ५० रुपये तर लखनौ वाणाला ५० ते ५५ रुपये दर मिळतो. कमाल दर प्रतवारीनुसार ७० ते ८० रुपयांपर्यंतही मिळाला आहे.
एकरी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पादन खर्च होतो. वाणांबाबत सांगायचे तर रत्नदीप वाणाची गोडी चांगली आहे मात्र टिकवणक्षमता थोडी कमी आहे. आतून लालसर आकर्षक रंग असल्याने ग्राहकांकडून त्यास चांगली पसंती असते.
लखनौ वाणाचा पेरू आकर्षक, चमकदार असून काढणीनंतर पाच ते सहा दिवस चांगल्या प्रकारे टिकतो.
अंजीर, सीताफळ उत्पादन
अंजिराचा खट्टा बहार घेण्यावर भर असतो. त्यास प्रतवारीनुसार किलोला ४०, ५० रुपयांपासून ते कमाल २०० रुपयांपर्यंतही दर मिळाला आहे. सीताफळासही प्रति क्रेट ५०० रुपयांपासून ते कमाल तीनहजार रुपये दर मिळाला आहे.
अलीकडेच बारामती येथून हैदराबाद सिलेक्शन वाणाची काही रोपे लागवडीसाठी आणली आहेत. कुटुंबात पत्नी, मुलगा, सून अशी सर्वांची मदत होत असल्यानेच शेती सुकर झाल्याचे काळे यांनी सांगितले.
पेरूची बाजारपेठ
यंदा खरिपात चांगल्या झालेल्या पावसामुळे पेरूचे उत्पादन अधिक झाले. त्यामुळे दरांमध्ये क्रेटमागे ( प्रति २० किलोचे) १०० रुपयांनी घट झाली. सध्या उन्हाचा चटका वाढल्यानंतर पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये अन्य फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
तुलनेने पेरूला कमी मागणी आहे. सध्या अवकाळी पाऊस आणि हंगाम नसल्याने दररोज ३०० ते ५०० क्रेट आवक आहे. प्रति क्रेट २०० ते ३०० रुपयांप्रमाणे विक्री सुरू आहे.
पेरूचे दर रुपये प्रति किलो
लखनौ ४९, सरदार २५० ते ५०० प्रति २० किलो क्रेट.
तैवान पिंक- १५ ते ४०
जे विलास, जंबो पेरू- १५ ते ३०
बाटली पेरू -- १५ ते ४०
वर्षभर विक्री
सप्टेंबरनंतर पुणे जिल्ह्यातील पेरूची आवक कमी होते. नगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर व कोपरगाव भागातील शेतकरी वर्षभर उत्पादन घेत असल्याने येथून आवक सुरू असते.
पुणे मार्केटमध्ये ऑक्टोबर ते जानेवारी काळात दररोज १००० ते १५०० क्रेट आवक होते. सर्वाधिक आवक ऑक्टोबरमध्ये असते. लोणावळा, खोपोली भागातील किरकोळ विक्रेत्यांकडून पेरूला चांगली मागणी असते. ४० ते ५० विक्रेते येथे मालाची खरेदी करतात.
संपर्क - विलास काळे - ९८५०५१७६८३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.