
Sugarcane Update : कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे (ता. करवीर) हा परिसर म्हणजे उसाचा मुख्य पट्टा आहे. कुंभी-कासारी सहकारी कारखाना येथून जवळ असल्याने बहुतांश शेतकरी ऊस याच पिकावर मुख्य भर देतात. गावातील कृष्णात धोंडिराम पाटील यांची सुमारे १४ एकर शेती आहे. त्यांचेही ऊस हेच मुख्य पीक असून, त्याचे ८ ते ९ एकर क्षेत्र असते.
जोडीला भात व सूर्यफूल ते घेत असत. पाच वर्षांपूर्वी एका कंपनीचे सूर्यफुलाचे बियाणे खराब लागल्याने पाटील यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर यापुढे पर्यायी पीक घेण्यासंबंधी त्यांनी विचार सुरू केला. अनुभवी शेतकरी, कृषी सेवा केंद्र चालक व अभ्यास यातून कारले पिकाचा पर्याय पुढे आला. त्याचा प्रयोग करून पाहायचे ठरविले.
कारले पिकाचा हुकमी पर्याय
पाच वर्षांपूर्वी धाडस केलेल्या कारले पिकात सातत्य राखत आज या पिकात पाटील यांनी कुशलता मिळवली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सुमारे एक एकर क्षेत्र त्यासाठी निवडतात. साधारणपणे जानेवारी महिन्यात उसाची तोडणी होते.
'त्यानंतर त्यातील ज्या एका भागात कारले घ्यायचे आहे तो नांगरून तयार केला जातो. उन्हाळा व त्यानंतर सुरू होणाऱ्या पावसाळ्यात भाजीपाल्याची चणचण असते. यामुळे अपवाद वगळता बहुतांशी दिवस भाजीपाल्यांना दर चांगले असतात हे गृहीत धरून कारल्याची लागवड एप्रिलमध्ये होते.
एकरी सुमारे वीस टन कंपोस्ट खताचा वापर, त्यानंतर सऱ्या पाडणे व बेसल डोस असे नियोजन होते. पाटील यांच्या शेतापासून जवळ भोगावती नदी आहे. तेथून पाइपलाइन करून पाणी आणले आहे. शिवाय दोन विहिरी आहेत. मात्र पाण्याचा वापर काटेकोर व्हावा यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. पॉलिमल्चिंग पेपरचाही वापर होतो.
तोडणी नियोजन
प्लॉट सुरू झाल्यानंतर एक दिवसाआड तोडा होतो. पहिल्या तोडणीला ५० ते ६० किलो कारली तोडली जातात. यानंतर दिवसाला ५०० किलोपासून एक टनांपर्यंत तोडणी होते. एक एकर क्षेत्रात एकूण १५ ते १६ वेळा तोडणी होते. प्रत्येक तोडणीला दहापर्यंत मजुरांची संख्या असते. दिवसभर तोडणी करून सायंकाळी पाचपर्यंत पॅकिंगची प्रक्रिया केली जाते.
त्यासाठी पंधरा किलो क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारली कोल्हापूर बाजार समितीत पाठविली जातात. कारल्याच्या शेतीसाठी मजुरांची खूप गरज लागते. या भागात मोठी मजूर टंचाई आहे.
मात्र पाटील यांचे क्षेत्र मोठे असल्याने उसाकडील किंवा अन्य पिकातील मजूर कारले पिकासाठी उपयोगात आणले जातात. हे पीक दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात घेतले जाते. त्यामुळे ते पीक उसाला चांगला बेवड असल्याचा अनुभव असल्याचे पाटील सांगतात.
उत्पादन व विक्री व्यवस्था
साधारण जुलै ऑगस्टच्या दरम्यान प्लॉट संपायला येतो. दरवर्षी एकरी १४ ते १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या तीन, चार वर्षांचा अनुभव लक्षात घेतल्यास किलोला सरासरी दर २५ रुपये मिळतो. हा दर ४० रुपयांपर्यंतही मिळतो.
शेत तयार करण्यापासून ते बाजारात कारली पाठवेपर्यंत दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो. कारल्याला कायम मागणी असल्याने दर शक्यतो २५ रुपयांपेक्षा खाली येत नाहीत, असा पाटील यांचा अनुभव आहे. पूर्वी संकेश्वर, बेळगाव या कर्नाटकातील भागांत ते कारली पाठवायचे. आता कोल्हापूर बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याने तेथेच पाठविण्याला प्राधान्य असते.
कारलेनंतर दोडका किंवा ऊस
कारले पिकानंतर पावसाळ्यात दोडका घेण्याचे नियोजन असते. मात्र या काळात पावसामुळे काही टन दोडक्याचे नुकसान झाल्याचा अनुभव आला. त्यामुळे त्यात सातत्य न ठेवता उसाचाही पर्याय ठेवला आहे. दोडका लागवडीसाठी नव्याने काही करावे लागत नाही. कारल्यासाठी उभारलेल्या मंडपामध्ये त्याचे पीक घेतले जाते.
हे पीकही कारल्याच्या जवळपास उत्पादन व दरही किलोस २० ते २५ रुपये मिळवून देणारे आहे. त्यामुळे कारले व दोडका अशी दोन्ही पिके सलग हंगामात झाल्यास काही लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची शाश्वती राहते.
पूर्वहंगामी वा सुरू उसाचे उत्पादनही एकरी ७० ते ८० टनांच्या दरम्यान पाटील घेतात. त्यामुळे वर्षभर ऊस व हवामानाने साथ दिली तर जोडीला दोन वेलवर्गीय पिके या पीकपद्धतीने पाटील यांच्या शेतीचे अर्थकारण उंचावण्यास मदत केली आहे. उसातील उत्पन्न मोठ्या खर्चासाठी तर वेलवर्गीय पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर रोजच्या खर्चासाठी करण्यात येतो.
आव्हानातून शेती यशस्वी
अलीकडील काळात हवामान बदलामुळे सर्वच भाजीपाला उत्पादकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. प्रत्येक वर्षी वेगळ्या अडचणी असतात. अनेकदा बियाण्यांची उगवण एकसारखी होत नाही. दुबार टोकणही करावी लागते. यामुळे प्लॉटचा कालावधी कमी जास्त होतो. वादळी वाऱ्यामुळे लाकडी मंडप कोसळूनही नुकसान होते.
काही वेळा कीडनाशकांची फवारणी करूनही किडी- रोग आटोक्यात येत नाही. अशा कारणांमुळे खर्चात मोठी वाढ होते. नैसर्गिक आपत्ती आल्यास व्यवस्थापन खर्च जवळपास दुप्पट होतो. गेल्या वर्षी दोन एकरांत कारले लागवड होती.
यंदा ती पुन्हा एक एकरात आहे. तरीही संघर्ष करीत प्रतिकूल परिस्थितीत आपली पिके टिकवून धरण्याचे प्रयत्न व सातत्य पाटील यांच्यात दिसून येते.
संपर्क - कृष्णात पाटील, ९०९६६२४२७३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.